नाशिकरोड येथील सराईताला एमपीडीए ॲक्ट अंतर्गत एका वर्षासाठी स्थानबद्ध…… अनिकेत उर्फ केरला राजु जॉन याची कारागृहात रवानगी…..
नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगाराला ०१ वर्षाकरिता एमपीडीए ॲक्ट अन्वये स्थानबध्द करण्यात आले आहे.नाशिक शहरात गुन्हेगारी फोफावत असून खून, दरोडे, घरफोडी, चैन स्नाचिंग, कोयते हल्ले सारखे गुन्हे सातत्याने घडत आहेत. गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्तांनी कठोर पावले घेत सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायदयान्वये प्रतिबंधक कारवाई सुरू केली आहे.
नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी रेकॉर्डवरील अनिकेत उर्फ केरला राजु जॉन, वय २४ वर्षे, राहाणार भारती मठ, सुभाष रोड, नाशिक याचे विरुध्द खंडणी आदी गुन्हे नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल असल्याने त्याचा स्थानबध्दतेचा प्रस्ताव पोलीस आयुक्त यांना सादर केला होता. १० जून रोजी स्थानबध्द आदेश मंजुर झाल्यापासुन सदरचा आरोपी हा फरार होता. आरोपीचा नाशिक शहरामध्ये तसेच सिन्नर व वावी परिसरामध्ये शोध घेतला असता तो मिळुन आला नाही. २७ जुलै रोजी सदर स्थानबध्द अनिकेत याचा शोध घेत असतांना पोलिस उप निरीक्षक संदिप पवार यांना अनिकेत उर्फ केरला राजु जॉन हा मनमाड या ठिकाणी असल्याची बातमी मिळाली होती. गुन्हे शोध पथकाचे मनमाड येथून त्यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेवुन त्याला १ वर्षाकरिता मध्यवर्ती कारागृह नाशिकरोड, या ठिकाणी स्थानबध्द करण्यात आले आहे.
सदर उल्लेखनिय कामगिरी नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाहब नाईकवडे, तसेच गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रविण सुर्यवंशी, पोलिस उप निरीक्षक संदिप पवार, अविनाश देवरे, विजय टेमगर, नितीन भामरे, विशाल कुंवर, समाधान वाजे, नाना पानसरे, अजय देशमुख, प्रशांत नागरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.