आंतरराष्ट्रीय योग दिनाचा हा उत्साह आपल्या संपूर्ण आयुष्यात असाच ठेवावा…. ब्रह्माकुमारी वासंतीदीदीजी…
भल्या पहाटे म्युझिकल योगा करण्यासाठी मोठ्या संख्येने योग साधक उपस्थित…
नाशिक – आज आंतरराष्ट्रीय योगा डे अतिशय यशस्वी राहिला. येथील भरगच्च प्रतिसाद बघून माझे मन भारावून गेले. या म्युझिकल योगाची म्हणा किंवा आपल्या स्वास्थ्याचे म्हणा सर्वांना असलेली ही एवढी जाणीव बघून मी अतिशय रोमांचित झाले आहे. हा उत्साह मात्र आजच्या दिवसा पुरताच नव्हे किंवा येथील ठक्कर डोमच्या कार्यक्रमापुरताच नव्हे तर आपल्या संपूर्ण आयुष्यात असाच ठेवावा. म्युझिकल योगाचे प्रणेते डॉ. उज्वल कापडणीस व डॉ. मनीषा कापडणीस यांचे मनापासून अभिनंदन करते की त्यांच्या अथक प्रयत्नातून हा म्युझिकल योगा सर्व दूर प्रसिद्ध झालेला आहे, सर्वांनी या म्युझिकल योगाचा अंगीकार करून आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राखावे असे प्रतिपादन राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दिदिजी यांनी केले.
दिनांक 21 जून रोजी येथील एबीबी सर्कल जवळच्या ठक्कर डोम सभागृहात योगा डे निमित्त ब्रह्माकुमारी संस्था व डॉक्टर कापडणीस म्युझिकल ग्रुप तर्फे आयोजित म्युझिकल योगा व राजयोग मेडिटेशन कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून दीदीजी बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील आमदार सीमाताई हिरे, पश्चिमच्या आमदार देवयानी ताई फरांदे, नगरसेविका सीमा ताई निगळ व प्रतिभाताई पवार, सिडको नगरसेविका अलका ताई अहिरे, माजी नगरसेवक अरुण नाना काळे, मा नगरसेविका स्वातीताई भामरे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त निवृत्त पोलीस अधिकारी माणिक गायकर, माधवी सूर्यवंशी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आमदार सीमाताई हिरे यांनी उपस्थिती दाखवली यात मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की 21 जून या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त डॉ. उज्ज्वल सर कापडणीस व डॉक्टर मनीषाताई कापडणीस यांनी व त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मात्र हा योगा डे एक दिवसापुरताच न राहता आपल्या जीवनाचा तो एक भाग झाला पाहिजे. आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्राचीन योगाला विश्व स्तरावर नेण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. या 21 जून योगा दिना निमित्त लाखो कार्यक्रम होत आहेत. देशातच नाही तर विदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात योगाचा प्रचार व प्रसार होत आहे. डॉक्टर कापडणीस पुरस्कृत म्युझिकल योगाच्या या कार्याला माझ्या भरपूर शुभेच्छा. तसेच करो योग रहो निरोग हा संदेश देणाऱ्या या योगा डे निमित्त सर्वांचे स्वास्थ्य चांगले राहो अशा शुभेच्छा सीमाताई यांनी याप्रसंगी दिल्या.
कार्यक्रमात समापन सत्रात उपस्थित राहून आमदार देवयानी फरांदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपल्या भारतातील प्राचीन योगाला आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी जागतिक स्तरावर पोहचवून भारताचे नाव उज्वल केले आहे. या योगाच्या माध्यमातून अनेकांना शरीर स्वास्थ्य विषयी जागृती झाली. मी सुद्धा पूर्वी एक तास आवर्जून योगा करत असे मात्र लोकप्रतिनिधी म्हणून आमदार या पदावर विराजमान झाल्यावर व्यस्ततेमुळे हा योगा करू न शकल्याने मला मधुमेहाने घेरले. त्यामुळे असे म्हणावेसे वाटते की जर जगण्याचा आनंद घ्यायचा असेल तर प्रत्येकाने नक्की योगा केला पाहिजे. तणाव नाही, असा कोणताही व्यक्ती सापडणार नाही. ज्या प्रकारे अंबानी यांना तणाव तर सामान्य व्यक्तीला सुद्धा तणाव असतोच त्यामुळे योगा केल्याने हा तणाव नाहीसा होतो. मी सुद्धा नुकतेच चार दिवसापासून योगा सुरू केलेला असून यापुढेही नियमित योगा करण्याचा मी मानस केला आहे. योगा प्रत्येकाने जरूर आत्मसात करावा. आयुष्यात आनंद व समाधान या योगानेच येत असते. या योगा प्रकाराला डॉक्टर कापडणीस यांनी विस्तृत स्वरूप प्राप्त करून दिल्यामुळे त्यांचे अभिनंदन फरांदे ताई यांनी याप्रसंगी केले.
अशोका हॉस्पिटलचे रेडिओलॉजिस्ट डॉक्टर राजेश जावळे यांनी ब्रह्माकुमारी संस्थेच्या राजयोगा मेडिटेशनचे प्राचीन व वैज्ञानिक महत्त्व स्पष्ट केले. भारतातील हा प्राचीन योगा लोप पावत असून फक्त स्वास्थ्यासाठी योगा केला जातो, यातही हा योगा सर्वजण करत नसून त्यामुळे मोठ्या प्रमाणात ताण तणाव व अनेक आजार वाढत असल्याचे डॉक्टर राजेश जावळे यांनी याप्रसंगी सांगितले. इतर सर्व योगा प्रमाणेच राज योगा मेडिटेशन चे सुद्धा जीवनात खूप महत्त्व असून तणाव मुक्त जीवन जगण्यासाठी हा योगा आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉक्टर राजेश जावळे यांनी याप्रसंगी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भल्या पहाटे म्युझिकल योगा करण्यासाठी मोठ्या संख्येने योग साधक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांनी केले. यात त्यांनी ब्रह्माकुमारी संस्थेचा राजयोगा मेडिटेशन मानसिक स्वास्थ्यासाठी अतिशय उपयुक्त असून या योगाद्वारे जीवनात सुख शांती प्राप्त होत असते. तसेच जीवन सुखकर करण्यासाठी हा राजयोग सर्वांनी करावा असे आवाहन केले.
कार्यक्रमात इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक चे अध्यक्ष अवधूत कुलकर्णी यांनी अतिशय कमी कालावधीत येथील म्युझिकल योगा ग्रुप ची बांधणी केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शहरातील योगसेवक व योग साधक उपस्थित होते. डॉक्टर कापडणीस यांच्या प्रेरणेने नाशिक मध्ये १५ ठिकाणी म्युझिकल योगा कार्यान्वित असून या योगा प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे व अनेक साधकांना स्वास्थ्य लाभ होत आहे. या विविध ठिकाणी होणाऱ्या म्युझिकल योगासाठी विविध क्षेत्रातील अधिकारी वर्ग व महिला मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. यापैकी राष्ट्रपती पदक विजेते श्री पांडुरंग कावळे सारखे अधिकारी तसेच समाज कल्याण अधिकारी, एक्साईजचे निवृत्त अधिकारी, अनेक कंपन्यांचे सीईओ, मानसोपचार तज्ञ, डॉक्टर, वकील, कृषी अधिकारी, शिक्षक, तुळजाभवानी मंदिर ट्रस्टी, अनेक सामाजिक कार्यकर्ते, व्यवसायिक तसेच नगरसेवक असे अनेक आजी व माजी अधिकारी वृंद हे हा म्युझिकल योगा करण्यासाठी नित्य नियमाने येतात अशी माहिती डॉ. मनीषा कापडणीस यांनी याप्रसंगी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी पुनम दीदी यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत ब्रह्माकुमारी विनादिदी, नीता दीदी, उज्वला दीदी, मंगल दीदी, कावेरी दीदी आदींनी केले. आभार प्रदर्शन येवल्याच्या निता दीदी यांनी केले. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन विविध 15 ठिकाणी होत असलेल्या म्युझिकल योगा ग्रुपच्या साधकांनी मोठ्या उत्साहाने व निष्ठेने केले.