पंचवटी गोळीबार प्रकरणी 3 जण ताब्यात
पेठरोडवरील फुलेनगर येथील मुंजोबा चौकात ११मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनेत एक महिला जखमी झाली होती. यानंतर पंचवटी पोलिसांचे चार शोध पथके संशयितांच्या मागावर होते. आज या घटनेतील तीन संशयितांना मखमलाबाद परिसरातून ताब्यात घेतले आहे. यातील एक संशयित फरार असून, लवकरच त्यालाही अटक केली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितले.
विकास उर्फ विकी विनोद वाघ जय संतोष खरात व संदीप रघुनाथ आहिरे असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या घटनेतील सर्व संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, फरार असलेला संशयित विशाल चंद्रकांत भालेराव हा तडीपार गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार ११ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास प्रेम दयानंद महाले हा युवक मित्र युवराज शेळके याच्यासह गप्पा मारत उभे होते. यावेळी संशयित विशाल, संदीप, जय खरात हे हातात कोयते घेऊन आले.
त्यांच्यासोबत असलेल्या विकी वाघ याचे हातात गावठी कट्टा हाेता. यावेळी विशालने शिवीगाळ करीत प्रेम यास मारहाण करीत काेयत्याने हल्ला चढविला. प्रेमने हा हल्ला चुकवून जीव वाचविण्यासाठी घाबरून घराच्या दिशेने पळ काढला. याच सुमारास विकी याने आपल्या कडील गावठी कट्ट्यातून प्रेमच्या दिशेने गोळ्या झाडल्या. या गाेळीबारात प्रेमची आई यांना एक गोळी चाटून गेल्याने त्या जखमी झाल्या. तर दुसरी गोळी प्रेम याच्या मावशीच्या पाळीव कुत्र्याच्या पायाला लागल्याने हा कुत्रा देखील गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर पंचवटी पोलिसांचे चार शोध पथके वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.सीताराम कोल्हे व पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत होते.