24 वर्षीय युवकाची आत्महत्या
हात उसनवार घेतलेल्या पैशांच्या तगाद्यामुळे येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली असून, या घटनेचा देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून, दुसऱ्याचा शोध सुरू आहे.
याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी संजय हरी गायकवाड (रा विद्यानगर, देवळा) यांनी संशयित प्रवीण सदाशिव आहेर (रा तीसगाव, ता देवळा) व अमोल निकम (रा. दाभाडी, ता. मालेगांव) यांचेकडून २१ लाख रुपये हात उसनवार घेतले होते. त्या पोटी फिर्यादी यांनी वरील संशयितांना तीन धनादेश दिले आहेत.
हे धनादेश खात्यावर पैसे नसल्याने वटले नाहीत. यामुळे त्यानी फिर्यादीचा मुलगा हर्षल संजय गायकवाड (वय २४, रा. विद्यानगर, देवळा) याला प्रत्यक्ष भेटून व मोबाईल वर वारंवार धमकी देत होते. या त्रासाला कंटाळून हर्षलने काल दुपारच्या सुमारास राहत्या घरी कोणी नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली आहे. देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी रात्री उशिरा प्रवीण आहेर या आरोपीला अटक केली असून, दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी भेट दिली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे करीत आहेत. संजय गायकवाड यांना मयत हर्षल हा एकुलता एक मुलगा होता. अत्यंत हुशार असलेल्या हर्षलच्या निधनाने देवळा शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे…