गद्दारांना शिवसैनिक धडा शिकवतील; सेना नेत्यांचा इशारा…..
गेल्या काही दिवसांपूर्वी काही जुन्या शिवसैनिकांनी अचानक शिंदे गटात प्रवेश केल्याने शहरात राजकीय वातावरण तापून उठले. शिवसेनेचा बालेकिल्ला नाशिकरोड देवळाली गावात कट्टर शिवसैनिकांनी बैठक घेतली. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना शिवसैनिक व मतदार धडा शिकविल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा देवळाली गाव येथे आयोजित केलेल्या ठाकरे गटाच्या शिवसेना मेळाव्यात उपस्थित नेत्यांनी दिला… दहा ते पंधरा दिवसापूर्वी येथील प्रभाग क्रमांक २१ चे शिवसेना नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, ज्योती खोले तसेच माजी नगरसेवक प्रताप मेहरोली, तर प्रभाग १९ च्या नगरसेविका जयश्री खर्जुल, राजू लवटे, श्याम खोले आदींनी शिंदे गटात प्रवेश केला
त्यामुळे नाशिकरोड शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला अशी चर्चा जनमानसात सुरू आहे. प्रभाग क्रमांक २१ व २२ मधील ठाकरे गटातील निष्ठावंत शिवसैनिकांची बैठक देवळाली गाव येथील यशवंत मंडईमध्ये रविवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला निष्ठावंत शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केल्याने बैठकीचे रूपांतर मेळाव्यात झाले. तसेच लवटे बंधूंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या यशवंत मंडईमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आल्याने या मेळाव्याकडे संपूर्ण नाशिकरोड वासियांचे लक्ष लागले होते तसेच या मेळाव्याच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मेळाव्यास शिवसेना (ठाकरे गट) उपनेते बबनराव घोलप, सुनील बागुल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, विनायक पांडे, वसंत गीते, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर या सर्व नेत्यांनी बंडखोरी करणाऱ्या व शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांवर टीकेची झोड उठविली.
ज्या शिवसैनिकांनी शिवसेनेशी गद्दारी केली त्यांना आगामी निवडणुकीत शिवसैनिक व मतदारच धडा शिकवतील असे उपस्थिती शिवसैनिक नेत्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या प्रभागात गद्दारांचा पराभव करून शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेशी ज्यांनी गद्दारी केली त्यांच्यासोबत कोणीही निष्ठावंत शिवसैनिक गेला नाही तर खरा व निष्ठावंत शिवसैनिक हा इथे बसलेला असून सर्व शिवसैनिकांनी एकजुट ठेवून आगामी काळात महापालिकेवर भगवा फडकवा असे आवाहनही या मेळाव्यात करण्यात आले. आता गद्दार ठरविलेले भविष्यात बाजी मारतात की कट्टर शिवसैनिक हे भविष्यात मतदार राजाचं ठरवणार. याप्रसंगी जयंत गाडेकर, सुधाकर जाधव, माजी नगरसेवक संतोष साळवे. सुनिता कोठुळे, रंजना बोराडे, प्रशांत दिवे, माजी आमदार योगेश घोलप, मंगला आढाव, योगेश गाडेकर, स्वप्निल आवटे, शिवसेना महिला आघाडीच्या भारती ताजनपुरे, शोभा मगर, पद्मा यांच्यासह ठाकरे गटातील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.