एमडी ड्रग्ज विक्री करताना एकाला अटक
गुन्हे शाखा युनिट १व आडगाव पोलिस ठाण्याची संयुक्त कामगिरी
आडगाव शिवारात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या ड्रग्ज पेडलर संशयिताला शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून दुय्यम प्रतिचे २७ हजारांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे धम्मराज उर्फ सागर बाळासाहेब शार्दुल (१८, रा. भाजी मंडईमागे, म्हसरुळ, नाशिक) असे संशयित ड्रग्जपेडलरचे नाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून एमडी ड्रग्जविरोधीतील कारवाया थंडावल्या होत्या. तर, शहर गुन्हे शाखेच्या पथकांकडून या गुन्ह्यांचे दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रकिया सुरु असतानाच बुधवारी (ता. १४) युनिट एकच्या पथकाचे अंमलदार विलास चारोस्कर यांना एमडी ड्रग्ज विक्रीसाठी पेडलर येणार असल्याची खबर मिळाली होती.
त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सायंकाळी पाच वाजता आडगाव हद्दीतील हनुमान नगरकडे जाणाऱ्या रोडवरील हॉटेल पेशवाच्या मागे सापळा रचला. संशयित ड्रग्ज विक्रीसाठी आला असता त्यास दबा धरून असलेल्या पथकाने शिताफीने अटक केली आहे.त्याच्या अंगझडतीतून त्यांच्याकडून २७ हजार ५०० रुपयांचे ५.५ ग्रॅम एमडी ड्रग्ज, दुचाकी असा ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याने हे ड्रग्ज कुठून आणले व त्याचा मुख्य सूत्रधार कोट आहे, ड्रग्जसाखळी कशी चालते, याचा तपास गुन्हेशाखा करीत असून, याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हेशाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण चव्हाण, युनिट एकचे सहायक निरीक्षक हेंमत तोडकर, चेतन श्रीवंत, महेश साळुंके, सोमनाथ शार्दूल, देविदास ठाकरे, मिलिंदसिंग परदेशी, विलास चारोस्कर, नितीन जगताप, मुक्तार शेख, राजेश राठोड, राहुल पालखेडे, अप्पा पानवळ, अमोल कोष्टी, समाधान पवार यांच्या पथकाने केली.