नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडू नये……. आमदार सरोज आहिरे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडे मागणी
जायकवाडी धरणासाठी पाणी प्रश्नावर कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, संभाजीनगर यांनी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधुन जायकवाडी धरणासाठी एकुण ८.६० टिएमसी पाणी सोडण्याबाबत आदेश काढले आहेत.
नाशिक जिल्ह्यात धरण परीसरात या वर्षी सरासरीच्या तुलनेत अतिशय कमी म्हणजेच ५०% इतकाच पाऊस झाला असुन लाभक्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. खरीपामधील सोयाबीन, मका हि पिके पावसाअभावी जळाली आहेत. लाभक्षेत्रातील विहिरींनीही आताच तळ गाठला आहे.
जायकवाडी प्रकल्पाचा १५ ऑक्टोंबर चा उपयुक्त पाणीसाठा ६५ % झाल्यास वरील भागांमधील धरणांमधुन पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. या वर्षी जायकवाडी धरणाचा १५ ऑक्टोबर चा उपयुक्त पाणीसाठा ५७.२५% इतका झाला आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधुन एकुण ८.६० टिएमसी इतके पाणी सोडण्याचे आदेश कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर यांनी काढले आहेत.
परंतु मेंढीगिरी अहवाल नुसार सन २०१३ मध्ये शासनास सादर केला असुन या अहवालाचे पुनर्विलोकन दर पाच वर्षांनी करणे गरजेचे आहे. तथापी अद्यापपर्यंत पुनर्विलोकन झालेले नाही.गंगापुर प्रकल्पातून नाशिक महानगरपालिकेच्या अस्तित्वातील पाणी पुरवठा योजनेच्या जॅकवेलमधुन तळातील ६०० दलघफू पाणी हे गाळ तसेच जॅकवेलपर्यंत पोहच कालव्याचे काम न झाल्याने उपयोगात येत नाही. सदर साठा हा मृत साठा गृहीत धरावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार सरोज अहिरे यांनी यापुर्वीच महामंडळाकडे केलेली आहे. त्यामुळे अस्तित्वातील गंगापुर, गौतमी व कश्यपी धरणांमधुन नाशिक शहर व औद्योगिक वसाहत, एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र यांची गरज भागविली जात असेल तरी हे साठे अतिशय कमी आहेत.
मा. उच्च न्यायालय जनहित याचिका केस क्र. १७३/२०१३ निकाल २३/९/२०१६ मधील निर्देशानुसार प्रथमतःवरील भागातील धरणांच्या पाणी साठ्याचे पुनर्विलोकन करावे व वरील भागातील गरजा पूर्ण झाल्याशिवाय जायकवाडी जलाशयास पाणी सोडु नये असे निर्देश दिलेले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील बिगरसिंचन व उद्योगधंद्यांच्या पाण्याची गरज वाढली असुन जलाशयातील साठे कमी असल्याने वरील धरणांमधील पाणी जायकवाडी मध्ये सोडणे शक्य होणार नसल्याने जायकवाडी धरणासाठी पाणी सोडू नये आणि नाशिक जिल्ह्यातील बारामाही द्राक्षबागा, फळबागा वाचविण्यासाठी वरील धरणांमधून सोडले जाणारे सुमारे ८.६० टिएमसी पाणी सोडण्याचे आदेश स्थगित करण्याची मागणी आमदार सरोज अहिरे यांनी केली आहे