पोलिस असल्याची बतावणी करुन लुटणारा इराणी गल्ली येथून चोरटा जेरबंद….. नाशिकरोड युनिट, गुन्हे शाखा, नाशिक यांची कामगिरी…..
आंबिवली येथील इराणी गल्लीमध्ये पहाटेच्या सुमारास थरारक सापळा रचत सराईत इराणी चोरटा जेरबंद करून १० गुन्हयांची उकल करून १८ लाखाचे १२३ ग्रॅम सोन्याचे दागिने नाशिकरोड युनिट, गुन्हे शाखेने हस्तगत केले आहे. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ०९:१५ वाजता उपनगर पोलीस ठाणेच्या हद्दीत दत्त मंदिराजवळ या ठिकाणी फिर्यादी जुलैखा नजीर शेख, वय ७४ वर्षे, गणेश दिप सोसायटी, बी २, दिप नगर, शिवाजी नगर, नाशिक या दत्त मंदिर येथुन पायी चालत त्यांचे घरी जात असतांना अज्ञात इसमांनी पोलीस असल्याची बतावणी करून १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन फसवणुक करून चोरून नेले होते.
उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयाचा पुढील तपास नाशिकरोड युनिट, गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक संदिप पवार हे करीत होते. नाशिक शहरामध्ये पायी पेट्रोलिंग, कायदयाचा बालेकिल्ला, पोलीसांचा रस्त्यावरील प्रेझेन्स, ठिकठिकाणी केलेली नाकाबंदी, कोम्बींग ऑपरेशन अशा प्रकारची कारवाई पोलिसांतर्फे सातत्याने करण्यात येत होते. याचा फायदा गुन्हेगारांनी घेवुन शहरामध्ये बनावट पोलीस बनुन रस्त्याने जाणाऱ्या वयोवृद्ध महिला व पुरुषांना गाठून पुढे पोलीस चेकिंग सुरू आहे किंवा पुढे खून झाला आहे, नाकाबंदी चालु आहे, तुमचे दागिने काढून पिशवीत ठेवा अशी बतावणी करून हातचलाखीने लंपास करीत होते.
नाशिकमधील इंदिरानगर, उपनगर आणि नाशिकरोड भागात वृद्ध नागरिकांना लुटण्याच्या घटना वाढल्या होत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, नाशिकरोड युनिटचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक संदिप पवार व मंगेश जगझाप, दत्तात्रय चकोर व भरत राऊत यांनी आरोपी येण्याजाण्याचा मार्ग निश्चित करून त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली असता आरोपीताचा फोटो प्राप्त केला. त्यानंतर सदर फोटो गोपनीय बातमीदारांना दाखवुन सदर आरोपी हा सराईत इराणी टोळीमधील एका इसम असल्याचे निष्पन्न झाले. गुप्त बातमीदारा नुसार फोटोमधील इसम हा संजु इराणी ठाणे आंबिवली येथील असल्याचे संदिप पवार यांना समजले.
आंबिवलीतील इराणी गल्ली हा भाग गुन्हेगारांसाठी कुप्रसिद्ध असल्याने आणि तेथून आरोपीला ताब्यात घेताना मोठ्या विरोधाची व कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीसांनी अत्यंत सावधगिरी बाळगली होती. संशयित संजु इराणी हा पहाटे ४ ते ५ च्या दरम्यान आंबिवली रेल्वे स्टेशनजवळ चहा पिण्यासाठी येतो, अशी गोपनीय माहिती मिळताच पोलीस पथकामधील पोलीस उप निरीक्षक संदीप पवार, अविनाश देवरे, दत्तात्रय चकोर आणि मंगेश जगझाप यांनी पहाटेच्या अंधारात आंबिवली रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सापळा रचुन संजु इराणी हा चहा पित असतांना शिताफीने आरोपीला गाठले आणि कोणालाही संशय येऊ न देता त्याला अलगद ताब्यात घेतले. आरोपीच्या समर्थकांकडून किंवा इराणी वस्तीमधुन विरोध होऊ नये, म्हणून पोलिसांनी त्याला तात्काळ खासगी वाहनाने सुरक्षितपणे नाशिकला आणले. अटक संशयित आरोपी जाफर मालीक सय्यद उर्फ संजु इराणी, वय ५३ वर्षे, रा.ठि. मंगल नगर, अटाळी गांव, अटाळी, ता. कल्याण, जि. ठाणे यास नाशिक येथे आणल्यावर त्याचेकडे नाशिक शहरामध्ये बनावट पोलीस बनुन केलेल्या गुन्हयांबाबत अधिक तपास केला असता त्याने उपनगर पोलीस ठाणेच्या हद्दीत दत्त मंदिराजवळ, दिपनगर, शिवाजीनगर, नाशिक या ठिकाणी एका वयोवृध्द महिलेची सोन्याची चैन नकली पोलीस बनुन हातचलाखी करून त्याचे इतर २ साथीदारासह चोरी केल्याची कबुली दिली. अधिक तपास केला असता त्याने इंदीरानगर, उपनगर व नाशिकरोड पोलीस ठाणेच्या हद्दीत १० ठिकाणी त्याचे साथीदारांसह नकली पोलीस बनुन हातचलाखी करून वयोवृध्द महिला व पुरुष यांना सकाळी किंवा दुपारच्या वेळेस गाठुन पुढे खुन झाला आहे, चोरी झाली आहे, एका महिलेला चाकु मारला, पोलीस चेकींग चालु आहे असे वेगवेगळे कारणे सांगुन त्याने सोन्याचे दागिन्यांची फसवणुक करून चोरी केलेली होती.
संजु इराणी याने गुन्हयातील चोरी केलेले काही सोन्याचे दागिने माणेक चौक, अहमदाबाद, राज्य गुजरात या ठिकाणी विक्री केलेली होती. पोलीस पथकाने माणेक चौक, अहमदाबाद, राज्य गुजरात येथे जावुन सोन्याची दागिने हस्तगत केलेली आहे. तसेच नमुद आरोपीताने काही सोन्याची दागिने आंबिवली येथे लपवुन ठेवलेली असल्याने तेथुन देखील काही सोन्याची दागिने हस्तगत करण्यात आलेली असुन अटक आरोपीकडुन १० गुन्हयाची उकल होवुन एकुण १८ लाख रूपये किंमतीचे १२३ ग्रॅम सोन्याची दागिने हस्तगत करण्यात आलेली आहेत.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त किरणकुमार चव्हाण व सहायक पोलीस आयुक्त संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिकरोड युनिटचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक संदिप पवार, पोलिस उप निरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, पोलिस उप निरीक्षक दिलीप भोई, सहायक पोलिस उप निरीक्षक मंगला जगताप, अविनाश देवरे, दत्तात्रय चकोर, मंगेश जगझाप, भरत राऊत यांनी यशस्वीरित्या केलेली आहे. तसेच सदरचा गुन्हा उघड करण्यासाठी तांत्रिक विश्लेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक जया तारडे व पथकाची मदत मिळाली.
