एलोपॅथिक डॉक्टरांचा संप शासनाच्या आश्वासनानंतर मागे….. IMA नाशिकरोड शाखेच्या अध्यक्षा डॉ. कांचन लोकवाणी……
होमिओपॅथिक डॉक्टरांना ऍलोपॅथिक औषधे लिहिण्याची सरकारकडून मिळालेली परवानगी आणि त्या विरोधातील आंदोलनाचा मुद्दा चिघळत असतानाच, अखेर मुख्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष हस्तक्षेपानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) प्रस्तावित एक दिवसीय संप मागे घेण्यात आला आहे. यामुळे नाशिकरोड भागातील सर्व खाजगी रुग्णालये सुरळीत सुरू राहिली आणि रुग्णांमध्ये निर्माण झालेली अनिश्चितता दूर झाली.
राज्य सरकारने नुकताच एक अध्यादेश काढून होमिओपॅथी डॉक्टरांना ऍलोपॅथिक औषधे लिहिण्याची मान्यता दिली, याला विरोध करत IMA ने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका न्यायप्रविष्ट असतानाही शासनाने अध्यादेश काढल्यामुळे ऍलोपॅथिक डॉक्टरांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. या निषेधार्थ IMA नाशिकरोड शाखेने शुक्रवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व खाजगी दवाखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. बंदची माहिती मिळाल्यानंतर रुग्णांमध्ये चिंता व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, गुरुवारी संध्याकाळी IMA चे राज्य अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांची राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीत डॉक्टरांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन सरकारने दिले.
यानंतर IMA नाशिकरोड शाखेच्या अध्यक्षा डॉ. कांचन लोकवाणी यांनी संप काही काळासाठी पुढे ढकलल्याची माहिती दिली. त्यामुळे शुक्रवारी नाशिकरोड परिसरातील सर्व खाजगी रुग्णालये सुरू राहिली आणि रुग्णांना दिलासा मिळाला.