दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोडला मॉकड्रील…… रंगीत तालीम….
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २७ पर्यटकांची हत्या केली होती त्यावरून भारत-पाकिस्तान युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तानची दाणादाण केली. अखेर पाकिस्तानने घाबरून युद्धविरामाची भारताला विनंती केली. भविष्यात काही दहशतवादी हल्ला झाल्यास त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगरचे रेल्वे पोलीस अधिक्षकांच्या आदेशानुसार नाशिकरोड रेल्वे स्थानकात दहशतवादी हल्ला उधळून लावण्याचे मॉक ड्रील (रंगीत तालीम) घेण्यात आले.
१५ मे रोजी सायंकाळी रेल्वे स्थानकातील जुना मुसाफिर खाना व फलाट क्रमांक एक वर सदर प्रात्यक्षिक घेण्यात आली. मुसाफिर खाना निंम्बस येथे एक बेवारस बॅग आढळल्याची माहिती प्रवाशाने रेल्वे अधिका-यांना कळविल्याने तत्काळ रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा दल घटनास्थळी हजर झाले. पोलिस व जवानांना बगमध्ये पांढरा मोठा सेल, काळया रंगाचे डेटोनेटर, दोन वायर अशी बॉम्बसदृश्य वस्तू दिसली.
खबरदारी म्हणून परिसर निमर्नुष्य करण्यात आला. ठाणे अमंलदारांनी नाशिकरोड शहर पोलीस कंन्ट्रोल रूम येथे माहिती दिली. बॉम्ब शोध व निकामी पथक, जलद प्रतिसाद पथक, दहशतवाद विरोधी पथकाला पाठविण्याची विनंती केली. नाशिक रोड अग्नीशमन दल, नाशिकरोड पोलीस ठाणे, बिटको रुग्णालय येथे संपर्क करून तात्काळ मदत मागविण्यात आली. हा सर्व फौजफाटा रुग्णवाहिका व साहित्यासह दाखल झाला. बॉम्ब शोध पथकाने श्वान अल्फा याच्या मदतीने बॅग तपासली असता त्यात विस्फोटक आढळली. त्यांनी योग्य रित्या हाताळणी करून बॉम्ब सदृश्य वस्तु नष्ट केली. ही बॅग ठेवणा-याचा रेल्वे सुरक्षा दलाने सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने शोध घेतला. तेव्हा एक संशयीत व्यक्ती भुसावळला जाणा-या लिफ्टच्या बाजूला बसल्याचे दिसले. जलद प्रतिसाद पथकाने तिकडे धाव घेतली. तेव्हा त्याच्या हातात रिमोट कंट्रोल दिसला. माझ्याजवळ येऊ नका, मी सर्वाना उडवून टाकेन व स्वतः मरून जाईन अशी धमकी त्याने दिली. जलद प्रतिसाद पथकाने त्यास गोळ्या घालून ठार केले.
या प्रात्यक्षिकात नाशिकरोड रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक नविन प्रताप सिंह, रेल्वे पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सचिन बनकर, बॉम्ब शोध उपनिरीक्षक राणे, सहा पोलिस तसेच पोलिस निरीक्षक कदम व त्यांचे सहा सहकारी, रेल्वे सुरक्षा बलाचे जवान, नाशिक रोड पोलीस ठाण्यातील पाच पोलिस, अग्नीशमन दल केंद्र प्रमुख जाधव, लिडींग फायरमन आर. डी. सोनवणे व चार कर्मचारी, बिटको रुग्णालयातील डॉ. स्वप्नील पाटील, पाच सहकारी, रेल्वेचे वैद्यकीय अधिकारी, जलद प्रतिसाद पथकाचे उपनिरीक्षक चव्हाण व आठ कमांडो, दहशतवाद विरोधी पथकातील उपनिरीक्षक हसन सैयद, पोलिस रविंद्र महाले, प्रगती जाधव, दहा पोलीस आदींनी सहभाग घेतला होता.