जनशिक्षण संस्थानच्या ‘ट्रॅडिशनल मालाकार’ प्रशिक्षणाचा समारोप
शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पी.एम. विश्वकर्मा या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील कारागिरांनी प्रशिक्षण घेऊन स्वतःचे उद्योग व्यवसाय उभारावे, असे आवाहन जनशिक्षण संस्थानचे अध्यक्ष तथा मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले.
जनशिक्षण संस्थानच्या वतीने पी.एम. विश्वकर्मा अंतर्गत सुरु असलेल्या ट्रॅडिशनल मालाकार या प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. संस्थेमार्फत कुशल प्रशिक्षण देऊन दर्जे दार कारागीर घडविण्याचे कार्य आमचे प्रशिक्षक करत असून, फुलांपासून विविध प्रकारचे हार, बुके, फ्लॉवरपॉट डेकोरेशन करत आहेत. हळद व लग्न समारंभासाठी वापरण्यात येणारे सजावटीचे साहित्य बनवून डोहाळे जेवणापासून ते लग्न समारंभापर्यंतच्या ऑर्डर घेऊन व्यवसायात परिपूर्णता आणावी आणि कुटुंबास आर्थिक हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या सहआयुक्त अनिसा तडवी यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनांची माहिती दिली. संचालिका ज्योती लांडगे यांनी मालाकार कोर्समध्ये सहा दिवस घेतलेल्या विविध उपक्रम व प्रशिक्षण तसेच उद्योग व्यवसायाची माहिती दिली. कोर्सच्या मार्गदर्शक शिक्षिका हर्षदा शेळके यांनी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणास खादी ग्रामोद्योग विभागाचे सुधीर केंजळे, पी.एम. विश्वकर्माच्या मयुरी मुर्तडक यांनी भेट देऊन शासकीय योजनांची माहिती दिली. कार्यक्रमात यशस्वी प्रशिक्षणार्थीना उद्यमी लायसनचे वितरण करण्यात आले. प्रताप देशमुख यांनी सूत्रसंचलन केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप शिंदे, संगीत देठे, दत्तात्रय भोकनळ, मनोज खांदवे, स्मिता उपाध्ये, पल्लवी मोरे, सविता पवार, अंजली धुमाळे आदींनी परिश्रम घेतले.