अखेर हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर…… महायुतीचा तिढा सुटला….. गोडसे यांनाच उमेदवारी मिळणार यांची खात्री नागरिकांमध्ये होती…..
नाशिक लोकसभेसाठी महायुती मध्ये गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेला तिढा सुटता सुटत नव्हता…आज अखेर महायुती तर्फे नाशिकची जागा शिवसेनेला सोडल्याने हेमंत गोडसे यांना उमेदवारी घोषित झाली. हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि जल्लोष पसरला. महविकास आघाडीकडून नाशिकची जागा उबाठा गटाला सोडल्यानंतर राजा भाऊ वाजे यांनी गेल्या दोन आठवड्यापासून प्रचार सुरू आहे. सोमवारी वाजे यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
महायुतीचा उमेदवार कधी घोषित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. गेल्या महिन्याभरापासून नागरिकांमध्ये हेमंत गोडसे शिवाय कुणाला उमेदवारी मिळणार नाही याची चर्चा आणि खात्री होती. महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या दाव्याने नाशिकची उमेदवारी जाहीर होण्यास विलंब झाल्याने महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांच्या विरोधात महायुतीकडून नेमका उमेदवार कोण याबाबत उत्सूकता वाढत चालली होती. आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या जागेवर शिवसेनेचे विद्यमान खा. हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादी तर्फे छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत होते मात्र भुजबळ यांनी माघार घेतल्याने भाजपचे इच्छुक दिनकर पाटील यांची चर्चा जोरात होती. हेमंत गोडसे यांना उमेदवारी घोषित झाल्याने दिनकर पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन ही केले होते मात्र शेवटी दोनदा मोठ्या फरकाने जिंकून आलेले हेमंत गोडसे यांना उमेदवारी घोषित झाल्याने कार्यकर्त्यांनी नाशिकच्या कार्यालय समोर फटाके वाजवत जल्लोष साजरा केला. हेमंत गोडसे यांना शिवसेनेच्या चिन्हावर हॅटट्रिक करण्याची संधी मिळाली असून जिंकण्यासाठी गोडसे काय आराखडा तयार करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.