झुलेलाल पतसंस्था गुढी पाडवा पासून नव्याने सेवेत रुजू…..
झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेचा उद्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दिनांक ९ रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पुन्हा नव्याने शुभारंभ होत आहे. त्यानिमित्ताने बहिराणा साहिब आणि सत्यनारायण पूजा करण्यात येणार असून खातेदार, ग्राहक, सभासदांनी दर्शनासाठी आवर्जून यावे असे आवाहन संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.
१९९७ मध्ये स्थापन झालेल्या झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेला सुरुवातीच्या काही वर्षानंतर मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागल्याने पतसंस्थेच्या ठेवीदार व सभासदांचा संस्थेवरील विश्वास डळमळीत झाला त्यामुळेच गत महिन्यात झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सभासदांनी नव्या दमाच्या संचालकांना संस्थेचा पदभार देताना त्यांच्याकडून संस्थेला गतवैभव प्राप्त करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्या दिनांक ९ रोजी सकाळी १० वाजता नासिक रोड येथील झुलेलाल भवन, डॉ. आंबेडकर रोड येथे संस्थेच्या मुख्य कार्यालयाचे नव्याने विधिवत पूजा करून सुरुवात केली जात आहे. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार गुरुमुख जगवाणी तसेच नाशिक तालुका सहनिबंधक संदीप जाधव यांचेसह ब्रह्मकुमारी वासंती दीदी व ब्रह्मकुमारी गोदावरी दीदी उपस्थित राहणार आहेत. संस्थेचा पदभार स्वीकारल्यानंतर चावला यांनी संस्था कारभाराची सर्व माहिती एकत्र करून संस्था कशा पद्धतीने पूर्वपदावर येऊ शकते, याचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. संस्थेचे ठेवीदार, कर्जदार या सर्वांना विश्वासात घेऊन प्रत्येक खातेदाराची केवायसी करून कर्ज वसुलीबाबत शासनाच्या निर्णयानुसार कार्यवाही करताना ठेवीदारांनाही दिलासा दिला जाणार आहे.
संस्थेचा दररोजचा कारभार व्यवस्थित चालावा व आर्थिक घडामोड सुरळीत राहावी यासाठी नाशिक जिल्ह्यात अल्पबचत प्रतिनिधी म्हणून १२ युवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचा एनपीए कमी करणे ही मुख्य बाब राहणार आहे, संस्थेच्या सभासदांबरोबरच कर्जदार व ठेवीदार यांचाही विश्वास संपादन करून त्यांना संस्थेविषयी आत्मीयता निर्माण करून देताना संस्थेचा आर्थिक ताळेबंदही योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न राहणार आहे. पूर्वी बँकेच्या मुख्य कार्यालयासह पाच शाखा कार्यान्वित होत्या सध्या फक्त मुख्य कार्यालयातील शाखा सुरू आहे. संस्थेला गतवैभव प्राप्त करून देण्याचा विश्वास नवनिर्वाचित चेअरमन रतन चावला यांनी व्यक्त केला.