चेट्रीचंड झुलेलाल जयंती महाउत्सव निमित्त १० एप्रिलला शहरात विविध धार्मिक कार्यक्रम…… मिरवणूक आणि बाईक रॅलीचे आयोजन…..
नाशिक सिंधी समाज बांधवांतर्फे नवीन वर्ष व भगवान झुलेलाल यांचा अवतरण दिवस चेट्रीचंड महाउत्सव येत्या १० एप्रिलला साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने नाशिक, नाशिकरोड, उपनगर आणि देवळाली कॅम्प येथील पूज्य झुलेलाल मंदिरांमध्ये दिवसभर कार्यक्रम असणार आहेत. त्र्यंबकरोड एबीबी सर्कल जवळील डक्कर डोम येथे नाशिक सिंधी पंचायततर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले असून, दिवसभर चालणार्या या उत्सवात धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम पार पडणार आहेत. रामी भवन येथे पुज्य बहिराणा साहेब स्थापना, पुज्य झुलेलाल साई यांची आरती केल्यानंतर बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
शहर परिसरातून निघणाऱ्या या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत केले जाईल. भगवान झुलेलाल यांच्या पेहरावात भगवान मोटवानी या रॅलीतील रथावर सहभागी होतील. इतरही संतांच्या पेहेरवात कलाकार सहभागी होतील. रॅलीनंतर ठक्कर डोम याठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मुंबई येथील सिंधी गायक जतिन उदाजी यांच्या गायनाचा आस्वाद समाज बांधवांना घेता येणार आहे. यानंतर डॉ.विजय सेतपाल महाराज मार्गदर्शन करणार आहेत. विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मेळा कमिटी अध्यक्ष अशोक पंजाबी, किशन अडवाणी, नाशिक सिंधी पंचायतीचे अध्यक्ष अडवोकेट प्रकाश आहुजा, उपाध्यक्ष शाम मोटवानी, योगेश दंडवानी, शंकर जयसिंघानी, योगेश तेजवानी, गनु इसरानी यांनी केले आहे
नाशिकरोड कलानगर येथील पूज्य झुलेलाल मंदिरात कार्यक्रम आणि महाप्रसाद होणार आहे. मुक्ती धाम येथून सकाळी ६ वाजता मुक्ती धाम, बिटको जेलरोड कलानगर झुलेलाल मंदिरापर्यंत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ९ वाजता पूज्य बहिराणा साहिब पूजा, १० वाजेपासून रक्तदान शिबिर, ११ वाजता दी मा भगवान यांचे सत्संग, दुपारी लहान मुलांचे सिंधी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. दुपारी १२ वाजता मुक्ती धाम पासून नाशिकरोड परिसरातून मंदिरापर्यंत बाईक रेलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी धुलिया येथील विजय कुमार अँड पार्टीत आणि जबलपूर येथील पुनीत डान्स ग्रुपचे कलाकार सिंधी गीतांवर रंगारंग कार्यक्रम सादर करणार असल्याने भाविकांनी कार्यक्रमात सहभाग घ्यावे असे आवाहन श्री झुलेलाल चॅरिटेबल ट्रस्ट आणि पूज्य झुलेलाल सिंधी सेवा मंडळाने दिली. देवळाली कॅम्प येथे सिंधु सेवा मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे झुलेलाल मंदिरात सकाळी बहिराना साहिब पूजा दुपारी बाईक रॅली नंतर महाप्रसाद, सायंकाळी देवळाली कॅम्प परिसरात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे देवळाली कॅम्प झुलेलाल जयंती अध्यक्ष दिनेश साधवाणी यांनी सांगितले.
उपनगर सिंधी झुलेलाल मंदिरातही जयंती निमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सकाळी पूज्य बहिराना साहिब पूजा, दुपारी बाईक रॅली, भंडारा तसेच सायंकाळी उपनगर परिसरात मिरवणूक काढण्यात येणार असल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने मिरवणुकीत भाग घ्यावे असे आवाहन जयराम कटारिया, महेश बनसिंघानी, रमेश जगवाणी, राजेश रामसिंगानी, नानक केस्वानी, धरमु जगवानी, जमनु पूर्सवानी यांनी केले आहे.