निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात लावलेले राजकीय बॅनर हटविले…… नाशिकरोड अतिक्रमण विभागाची कारवाई……
आचारसंहिता लागू झाल्यानंतर नाशिक मनपाचे अतिक्रमण विभाग ॲक्शन मोडवर असून महानगरपालिकेच्या नाशिक रोड अतिक्रमण विभागाच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्याने गेल्या ४ दिवसात नाशिकरोड विभागातील ७०० झेंडे, ८० होल्डिंग, सहा दिशादर्शक कमानी वरील १२ बॅनर, ३५ कटआउट कारवाई करून जप्त करण्यात आलेले आहे.
नाशिक मनपाच्या वतीने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्याने नाशिक रोड विभागातील राजकीय बॅनर फलक, भिंती पत्र हटविण्याच्या प्रक्रियेला जोमाने सुरुवात करण्यात आलेली आहे.त्यानुसार गेल्या ४ दिवसात नाशिक रोड विभागातील बिटको पॉईंट, दत्त मंदिर चौक, शिवाजी महाराज पुतळा, चेहडी हद्द, सिन्नरफाटा परिसरासह विभागाने कारवाई करण्यात आली आहे.
ही मोहीम महानगरपालिका विभागीय अधिकारी तुषार आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधिकारी मिलिंद जाधव, अमित पवार, अशोक गोसावी, मधु पवार, नंदू शिंदे, कुमार गांगुर्डे, सागर गिर्जे, गणेश सकट, शांताराम घंटे यांनी राबवली आहे. राजकीय पक्षाचे बॅनर किंवा आचारसंहिता भंग होईल अशा आशयाचे काही होर्डिंग्ज वगैरे आल्यास त्यांनी काढून घेऊन आचार संहितेचे पालन करण्याचे आव्हान नाशिक महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.